Friday, February 28, 2014

हसऱ्या चष्म्यातून ...2

गेला मोहन कुणीकडे  …!!!!

ऑक्टोबर महिना म्हणजे कडक ऊन आणि प्रचंड उकाडा. तोच महिना संपता संपता , पूर्वेचे वारे वाहू लागतात आणि दिवाळीचे वेध लागायला लागतात. लहानपणी दिवाळी म्हणजे आकाशकंदील, फराळ , किल्ला आणि फटाके  एवढाच समीकरण होतं.  दिवाळीचा फराळ आणि सहमाही परीक्षेचा (mid-sem चा ) काळ असं combination असे . एकीकडे आई बनवत असलेल्या चिवड्याचा खमंग वास आणि दुसरीकडे आकाशकंदील , फटके आणि नवीन ड्रेस (तोही एका वर्षी एकच)  खरेदीचे वेध अश्या मनस्थितीत अभ्यास करणे किती अवघड होते. सहामाही परीक्षेत कमी गुण का मिळायचे ते आत्ता कळत आहे. तेंव्हा पण हे कळत होतेच पण कळूनही न वळणे ह्या म्हणीचा पुरेपूर वाक्यात उपयोग करणे हे कोणी न शिकवताच कळले होते. चिवड्याचा खमंग वास , मनात तरंगणारी करंजीची होडी, चकल्यांचे काल्पनिक चक्र , कद्बोळ्याञ्चे आकडे हेच सगळे पुस्तकात दिसत असे, त्यामुळे पेपरात लाडू मिळणे हे नेहमीचेच. हा लाडू नावडीचा, एकदम गोल गोल , आणि लाल रंगाचा . हा लाडू मिळाल्यावर धम्मकलाडू पण आपोआपच मिळत असे. म्हणून मला बुंदीचा , रव्याचा ,  बेसनाचा, डिंकाचा कुठलाच लाडू कधीच आवडला नाही. :))))

अंदाजे पाचवी , सहावीत गेल्यावर फराळा मधील curiosity अजून वाढू लागली ,  दिवाळीचा दिवस येई पर्यंत फराळ खायला मिळणार नाही असा rule असल्याने वसुबारस येई पर्यंत फक्त खमंग वासाने पोट भरावे लागे. पण आईला मदत केल्यास फराळ टेस्ट करायला मिळतो हे माझ्यातल्या नटखट Sonia ने जाणले होते. म्हणून फराळ कसा करतात हे बघायला स्वारी स्वय्पाघरात तयार असे. पेपरात  लाडू गोल मिळणे किती  सोप्पे आणि खरा लाडू गोल वळणे किती अवघड आहे असे वाटू लागले. चकल्या  कधी खुसखुशीत तर  कधी मऊ कश्या पडतात हे मोठे कोडे अजूनही उमगले नाही आहे  किंवा अनारसे हसले म्हणजे काय अश्या वाक्यांचा प्रयोग कळू लागला.  कळत न कळत आईचे मुलीला ट्रेनिंग देणे चालू होते. चिवड्याचे पोहे हे अनेक प्रकारचे असतात तेंव्हा कळले. पण त्यातला nylon पोहे हा प्रकार पचतो कसा ह्यावर  मला  research करायचा होता , तो अजूनही राहूनच गेला आहे. शंकरपाळ्यांना शंकर-पाळे का म्हणतात हे कोडे मला नेहमी पडे.  आज २० वर्षांनी ते कोडे  सुटले आहे . तो मूळ शब्द हिंदी, त्याला शख्खर-पारे  म्हणजे साखरेच्या पोळ्यांचे काप असे  म्हणतात. या शख्ख्ररपारे मधे शंकराला कोणी आणला हा मोठ्ठा प्रश्न आहे. पण त्या निमित्ताने शंकराचं नाव मुखी येते हे थोडे थोडके नव्हे. अनारस्याला वरून जो रवा लावतात तो रवा  नसून त्याला खसखस म्हणतात. लाडू बनवताना खमंग वास सुटतो तो तुपात रवा किंवा बेसन भाजल्याने असा आईची शिकवणी चालू असे. त्यामुळे खरचच आईला मदत करावी असे वाटू लागले होते. मग लाडू वळायला मदत करणे ,  शंकरपाळे करणे, कारंजीला आकार देणे , मधूनच चिवडा taste करणे … मग हे आणून  दे , ते आणून दे , डब्यात भरून ठेव अशी छोटी छोटी कामे पर्वणी वाटू लागली.

असेच एका वर्षी चकली करणे चालू होते. आई चकलीचे पीठ मळत असल्याने तिने मला आतून मोहन आणावयास सांगितले. मी आत गेले आणि मोहन शोधू लागले. (मोहन  म्हणजे गरम केलेले तेल) छोटे डबे झाले , मध्यम डबे , मोठ्ठे डबे झाले मोहन काही सापडेना. असं वाटलं शेजारच्या रानडेंच्या मोहनदादाला आणून उभं करावं !! तेवढ्यात आवाज आला "आता गार झालं असेल पण सावकाश आण". मी विचार सुरु केला गार झालं असणार म्हणजे फ्रीज किव्हा माठापाशी काहीतरी असणार. मी तर confidently आले आहे मोहन आणायला , मग विचारायचे कसे - मोहन म्हणजे काय ?… माझ्यापुढे मोठ्ठा प्रश्न पडला होता … पण तरी स्वारी विचारायला तयार नव्हती … केवढा मोठ्ठा ego होता ह्या चिमुरड्या जीवामध्ये … तो इगो की independent आणि knowledgeable असल्याची जाणीव होती !!  हार पत्करणे रक्तातच नाही.

मी फ्रीज मध्ये शोध शोध शोधले , पण मोहन काही सापडेना , काय सापडायचे आहे हेच माहीत नसल्याने झालेली मोठी पंचाईत झाली होती. शेवटचा प्रयत्न म्हणून माठाजवळ शोधणे सुरु केले. मागे पुढे आत बाहेर सगळीकडे पहिले. आता मी तिपाहीच्या खाली बघावे  म्हणून माठ उचलला. पाण्याने भरलेला माठ , मला पेलवणार तो  कसा!! माझा हात सटकला, माठ फुटला आणि पाणी सांडले , त्यात माझापाय सटकला आणि मी त्या पाण्यात पडले !!…. काही फुटल्याचा आणि धप्पकन पडल्याचा आवाज ऐकून आई ,बाबा , लहान भाऊ , मदतीला आलेल्या शेजारच्या काकू सगळे स्वयापाघरात जमा झाले माझी अवस्था केविलवाण्या कुत्र्याच्या पिल्लासारखी झाली …. अचानक माझं मलाच हसू आलं आणि मी आईला म्हटलं …
पाणीच पाणी चहु कडे गं बाई…  गेला मोहन कुणीकडे ?????????? :))))


हसऱ्या चष्म्यातून ...1

चंद्रशेखर गोखल्यांच्या ('मी माझा' फेम) जमान्यात बरेच कवी चारोळ्या लिहू लागले , मी ही थोडा प्रयत्न केला ,पण माफकच …


जसे …।

कधी कधी वाटतं
सांज वातीकडे एकटक पाहत राहावं
कोणी आपल्याकडे बघू नये
पण आपला जग मात्र एकट नसावं ...

-----------------------------------------------------------------------
लिहायला घेतलं  तर
मनात शंका येत जातात
पेन धीर देतं आणि
कागदावर अक्षरं उमटत जातात
-----------------------------------------------------------------------

काही  चारोळ्या लिहिल्यानंतर कळलं चारोळ्या लिहिणं म्हणजे श्रीखंडातील चारोळ्या शोधण्यापेक्षाही कठीण काम आहे :)))))))))) त्यामुळे श्रीखंड फक्त  खावे  ते  बनवण्याच्या  फंदात  पडू  नये . त्यातूनही  चारोळ्या  घातलेल्या  श्रीखंडाच्या  तर  अगदीच  नाही .

हसऱ्या चष्म्यातून ...

दिवस खूप busy जातो, तेंव्हा असं वाटत पट्कन जेऊन झोपावं, आडवं पडल्यावर लगेच झोप लागेल. पण तसं होत नाही. मनामध्ये अचानक भरमसाठ विचार थैमान घालू लागतात. इतके विचार असतात की ते कागदावर उतरवल्याशिवाय झोप लागत नाही. दुसऱ्याच्या मनात काय चालू आहे ह्याचा थांगपत्ता लागत नाही असं म्हणतात. ते खरं आहे. पण आपल्याच  मनाच्या  कप्प्यात काय चालू आहे हे कळेनासं होत ,तेव्हा काय?  माझा funda आहे की सगळं लिहून काढावं. उगाच रात्र जागवण्यापेक्षा ते बरं नाही का !! विचार कुठून येतात ते कळत नाही . पण कागदावर उतरवल्यावर खूप काही समाधान मिळतं. असंख्य कवी आणि लेखकांच हे असच आहे ,उमगलं आहे मला  (अर्थात मी काही कवी किंवा लेखक आहे असं म्हणायचं नाही , पण असो ). हे असं का ह्याचं astrological analysis करायचा माझ्यातल्या  अर्धवट astrologer ने  प्रयत्न केला. बुधाची चमक की शुक्राची झळाळी असते अश्या कवी लेखकांमध्ये ते कळलं नाही. पण गुरुबळ सगळीकडेच हवं हे मात्र नक्की. म्हणजे पू. ल. , व.पु , कुसुमाग्रज, बालकवी ह्यांसारख्या दिग्गजांच्या लिखाणाची पारायणे करण्याने काहीतरी लिहायची खुमखुमी येत नाही हे दुर्मिळच. असे दिग्गज म्हणजे आपले गुरु, मग  ग्रह तारे पाहिजे कशाला. अश्या गुरूंच्या पुस्तकांच्या सानिध्यात राहून आपली प्रतिभा वाढवावी, खुलावावी.

कवी आणि लेखक (दोघेही तत्ववेक्ते ) ह्यांच्या पासून लोकं चार फर्लांग दुरून जातात हे सत्य आहे. त्यामुळे कवी आणि लेखकांनी लोकं आपल्या पासून किती फर्लांग दुरून पळत आहे त्यावर प्रतिभेचे प्रदर्शन करावे. :)) ह्यात दोष हा कवी चा नाहीच मुळी,  त्या कविता समजणाऱ्याचा आहे. कारण कवी लिहितो, पण त्याचे अर्थ काढणे; हे वाचणाऱ्याच्या बुद्धिमत्तेवर अवलंबून आहे. प्रेम कविता लिहिल्यावर कवी प्रेमात पडला किंवा विरहगीत लिहिले म्हणजे नक्कीच प्रेम भंग झाला आहे असे conclusion सहज काढले जाते. ते कितपत खरे तो कवीच जाणो. पण देशप्रेमाच्या कविता लिहायला मात्र देशाच्या प्रेमात पडायलाच हवे हे शंभर टक्के खरं. 

माझ्या बऱ्याच  कविता वाचून , मी खूप दुख्ही आहे की  काय असा माझ्या आईचा समज(खरतर गैरसमज) होऊ लागल्यावर तिने मला एक सल्ला दिला . आईने दिलेला सल्ला हा फुकटचा कधीच नसतो , तो ऐकला नाही तर महागात पडतो त्यामूळे तो ऐकणे भाग पडले आहे. तुझे लिखाण करताना ते हसऱ्या चष्म्यातून बघ कदाचित तुला वेगळा आनंद मिळेल  आणि तुझ्या निरस कविता ऐकण्यापासून आम्हाला सुटका मिळेल !!!! :)))))    आता आईचा शब्द शेवटचा अश्या संस्कारात वाढल्याने मी हा प्रयत्न करत आहे . हसऱ्या चष्म्यातून माझ्याच विचारांना पाहणे आणि लिहून काढणे. पाहूया जमते आहे का ते !!

टीप : हा ब्लॉग वाचणारे अनेक उत्तम लेखक, कवी ,वाचक असू शकतात , त्यांना माझे  लिखाण सुमार वाटण्याची शक्यता आहे. तरी त्यांनी जपून वाचावे आणि सल्ले द्यावेत. आणि इतरांनी कृपया पळून जाऊ नये ही विनंती. :)))))


Thursday, February 27, 2014

Sing With My Heart IX !!

I love this poem because the concept kicked my mind to give a hug to the death. Death(as conceptually a person..) comes to you and call you 'his friend'. Poet never met a person who called him a 'friend'.
This also explains the concept of moksha(state of soul which is not tied to birth and death cycles). Death wants to hug him because Mr. Death doesn't know if he can meet poet again.. when poet gets moksha, he may not be able to meet death again.  I mean , I tried to gave a serious thought to accept the truth at the end of life.
Mitra ...
मित्र
एकदा अचानक समोर कोणीतरी
येऊन उभा ठाकला
'अरे मित्रा' ओळखलस का
मी जिवलग तुझा एकला

म्हंटला मला ,

वर्षानुवर्ष वाट पाहत होतो
कधी एकदा भेटशील
गळाभेट घ्यावी एकदा
माहीत नाही पुन्हा कधी भेटशील

मी म्हंटलं ,

मी ओळखलं नाही तुम्हाला
जरा क्षमा करा मला
झाली आहे मती क्षीण
दृष्टीत आहे बिंदू झाला
 
असेल कदाचित गत जन्मीची ओळख
एकदा स्मरून द्या मला
असं म्हंटल्यावर अगदी
हसून तो म्हणाला

हो अनंत जन्मीचे मित्र आपण
असाच होतास पूर्वी पाहिलेला
अरे गतजन्मीच भेटलोना आपण
नि मृत्यू म्हणतात मला ..!!!

क्षणिक मी चपापलो
देह सारा घामाघूम झाला होता
कोण सांगू मी माझा मृत्यू
याची डोळा पहिला होता !!!!

जन्मभर ज्याला मी
नेहमीच दूर ठेवलं होतं
ते एक सत्य 
समोर उभं राहिलं होतं
 
क्षणभर विचार करून मी त्याला 
हसत मिठीत घेतला होतं
कारण उभ्या आयुष्यात फक्त त्यानेच 
मला मित्र म्हंटला होतं ......

-Sonia

Sing With My Heart VIII !!

'Break up '.. The most hated word ...A true story of my friend ...
तुला सोडून जाताना

एक स्वप्नं विरून जाताना
तुला सोडून जाताना
मीच पाहत होते माझी
प्रेमगीते बेसूर होताना

प्रत्येक क्षणाला अर्थ असतो 
थकले मी तुला समजावताना
कदाचित तुला जाणीव होईल त्याची
मी तुला सोडून जाताना

प्रत्येक क्षण होता तुझाच
तुला क्षणीकही पाहताना
तो क्षण तुझ्याकडे कधीच नव्हता
आपण सोबत असताना

सावली सारखा सोबत राहशील
तू माझ्या आयुष्यातून हरवताना
पण आज हवा आहे तुझा एकच क्षण
तुला सोडून जाताना

तुझे गीत नि माझी प्रीत
विरून जाईल क्षण सरताना
माझ्याकडे राहील आसवांची रीत
फक्त तुला सोडून जाताना

हेच असत्य हरून जाताना
तुला सोडून जाताना
मीच ऐकत होते माझी
प्रेमगीते बेसूर होताना


-Sonia

Sing With My Heart VII !!

This is a common story of 'The missing train'
A guy revealing that ..
सांगायचच राहून गेलं ...

तुझं माझ्या जीवनात येणं,
हे जगायला एक कारण ठरलं ,
पण तुला जे माहीत नव्हतं,
ते सांगायचच राहून गेलं ...

 

तुझं ते सुंदर दिसणं,
तुझं ते लोभस बोलणं ,
तुझं ते खट्याळ रागावणं ,
माझ्या मनात घर करून राहिलं,
पण तू सुंदर दिसतेस , हेच सांगायचं राहून गेलं ....


तुझं ते खळाळून हसणं ,
तुझं ते मादक लाजणं ,
तुझं ते सुरेल गाणं ,
माझ्या मनाला मोहून गेलं ,
पण तू सुंदर गातेस , हेच सांगायचं राहून गेलं ...

कसं आणि केंव्हा सांगावं ,
याचं गणित मांडत असतानाच ,
तूझं माझ्या जीवनातून निघून जाणं ,
हे माझ्या जीवाला व्यथा देऊन गेलं ,
कारण बहुतेक ,
माझही तुझ्यावर प्रेम आहे , हे सांगायचच राहून गेलं ....
Sonia

Saturday, February 8, 2014

Sing With My Heart VI !!

Poetry is the spontaneous overflow of powerful feelings: it takes its origin from emotion recollected in tranquility : William Wordsworth 
उमगे  ना माझे मला
कंठ कधी हा दाटला
हरवले गाणे ओठामध्ये अन
स्वर कुठे हा हरवला …

वेचली स्वप्न फुले मी
मनी  रंग ही  गंधाळला
गंध राहिला ओंझळीत  अन
रंग  खाली सांडला …

समजे  ना माझे मला
हा दिवस कधी सांजावला
आभाळ झाले मोकळे अन
 ऊन-सावलीचा खेळ संपला …

Sonia